प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांना ‘वि. वा. हडप स्मृती कादंबरी पुरस्कार'
गुहागर (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कादंबरी प्रकारातील प्रतिष्ठित ‘वि. वा. हडप स्मृती पुरस्कार’ यंदा प्रा. डॉ. बाळासाहेब लबडे यांच्या ‘चिंबोरे युद्ध’ या कादंबरीस देण्यात आला आहे.
साहित्यसेवेतील डॉ. लबडे यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांनी आतापर्यंत १९ पुस्तके प्रकाशित केली आहेत. कविता, कादंबरी, संपादन, समीक्षा, अनुवाद, सहलेखन या सर्व क्षेत्रात त्यांचा ठळक ठसा आहे.
समीक्षक दीपक बोरगावे यांच्या मते, “‘चिंबोरे युद्ध’ ही कादंबरी ग्रामीण राजकारण, सामाजिक विषमता आणि मानवी संघर्ष यांचे वास्तववादी चित्रण करते, पात्रे जिवंत आणि कथानक तणावपूर्ण आहे.” तर सर्जेराव रणखांब म्हणतात, “लबडे यांची भाषा जिवंत अनुभवाची आहे; ही कादंबरी फक्त कथा नाही, तर काळाचे दस्तऐवजीकरण आहे.”
याआधी त्यांच्या ‘पिपिलिका मुक्तिधाम’, ‘शेवटची लाओग्राफिया’, ‘काळमेकर लाइव्ह’ या कादंबऱ्यांना राज्यभरातील पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. कविता संग्रह ‘महाद्वार’, ‘मुंबई.. बंबई.. बॉम्बे..’, ‘ब्लाटेंटिया’ आणि संपादित ग्रंथांमुळे ते साहित्यवर्गात चर्चेत राहिले आहेत.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी श्री आबा पाटील म्हणाले, “लबडे यांचे लेखन कोकणच्या साहित्यिक परंपरेला नवा आयाम देणारे आहे.” या पुरस्कारामुळे डॉ. लबडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0