श्री चिन्मय स्विम मॅरेथॉनमध्ये ठाण्याच्या युवा जलतरणपटूंची ऐतिहासिक कामगिरी

Jul 28, 2026 - 08:44
 0  2
श्री चिन्मय स्विम मॅरेथॉनमध्ये ठाण्याच्या युवा जलतरणपटूंची ऐतिहासिक कामगिरी

भारतीय संघाला प्रथमच रजत पदक

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करणाऱ्या तथा ठाणे जिल्हा हौशी जलतरण संघटनेशी संलग्न असलेल्या स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या युवा जलतरणपटूंनी स्वित्झर्लंडमधील झुरिच लेक येथे झालेल्या ३८ व्या श्री चिन्मय स्विम मॅरेथॉन स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केले आहे. २६ किलोमीटर अंतराच्या वेटसूट सांघिक प्रकारात भारतीय संघाने प्रथमच रजत पदक पटकावत देशाचा गौरव केला. आमदार निरंजन डावखरे, नगरसेवक राजेश मोरे यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.

या संघामध्ये कु. आयुषी कैलाश आखाडे (वय १५, डीएव्ही पब्लिक स्कूल, ठाणे), कु. समीप्ता गणेश वाव्हळ (वय १२, डीएव्ही पब्लिक स्कूल, ठाणे) आणि कु. सुयश प्रियंका हिंदळेकर (वय १४, श्रीरंग विद्यालय, ठाणे) यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी झालेल्या दहा संघांमध्ये भारतीय संघ हा वयाने सर्वात लहान संघ होता.

या जलतरणपटूंनी तब्बल २६ किलोमीटरचे अंतर ८ तास ७ मिनिटांत पूर्ण केले. स्पर्धेदरम्यान प्रचंड पाऊस, थंड वारे आणि अत्यंत थंड पाण्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक ठरली. प्रतिकूल हवामानाचा सामना करत भारतीय संघाने दाखविलेली जिद्द, चिकाटी आणि उत्कृष्ट सांघिक समन्वय यामुळे हे ऐतिहासिक यश शक्य झाले.

या उल्लेखनीय कामगिरीमुळे ठाणे शहरासह महाराष्ट्र आणि देशाच्या जलतरण क्षेत्रात अभिमानाची भर पडली असून, या युवा जलतरणपटूंवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0