....आणि माझे हात लिहिते झाले
सदर : मी असा घडलो
मी प्राथमिक शाळेत असताना, वाचनाची मला खूप आवड होती. त्या वेळी "चांदोबा" "चंपक" "हात्ती" आदी मासिके व लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स ह्या दैनिकांचे दिवाळी अंकही घरात असायचे. कथा वाचायला खूप आवडत असत म्हणून शाळे जवळचं असलेल्या लोकमान्य टिळक ग्रंथालयात जाऊन बसत, तिथे अनेक मासिकं वाचायला मिळतं. माझ्याही मनात येत, किती सुंदर लिहितात लेखक, वाचताना कथेतील पात्र किती जीवंत वाटतात, मग मनात एक विचार आला आपणही कहीतरी लिहावं मग काय लिहावं काही कळेना.
एकदा खूप डोक्याला ताण देऊन एक कविता लिहिली. बळ माझं लहान |त्याला लागली तहान|रांगत गेला तळ्यान| घान झाला चिखलानं |असंच काहीतरी लिहीत असताना मनात विचार आला कथेत काय असतं, ते असं आपल्याला सुचायचं नाही. म्हणून आपल्या जीवनात रोज काय घडते ते लिहून ठेवावे म्हणून अभ्यासाच्या वहीच्या मागील पानावर मी दिवसभराचा वृत्तांत उतरवून ठेवू लागलो. आंम्हाला खोर्जेकर नावाच्या बाई होत्या. मला बाहेरील साहित्य वाचनाची जेवढी आवड होती तेवढी शालेय पुस्तकांची नव्हती. माझी कोणतीही वही कधीचं पूर्ण नसतं. त्या मुळे नेहमी कान पकडून उभे रहाने, अंगठे पकडून उभे रहाने हे नित्त्याचेचं झाले होते. एकदा खोर्जेकर बाई मला म्हणाल्या उद्या आईला घेऊन शाळेत यायचं, नाहीतर वर्गात घेणार नाही. आईला घेऊन ये म्हणटंल्यावर मी खूप घाबरलो, घरी आई आणि वडील दोघेही मारणार, आता करायचं काय मोठी गोची झाली. माझ्या वर्गात आमच्या इथे रहात असलेला एक मुलगा होता. त्याचे नाव होते बबन त्याच्याकडे नेहमी तीस, चाळीस रूपये असायचे. तेव्हा दहा पैसे, पाच पैशात खूप खाऊ मिळायचा. चेंबुर हायस्कृलच्या कँटिंग मध्ये तेव्हा तीस पैशाला चटनी पाव मिळत, तो मला म्हणाला, माझ्याकडे एक आयड्या आहे. "आई भाड्याने घ्यायची" मी म्हटलं, ती कशी, तो म्हणाला हे बघ शाळा सुरू झाल्या पासून तुझी आई शाळेत आली नाही, त्या मुळे बाई तुझ्या आईला ओळखत नाहीत. मी म्हटलं, मग पुढे काय करायचे ते सांग. तो म्हणाला उद्या शाळा भरायच्या आत चेंबुर नाक्याच्या सिग्नल जवळ जाऊया, बाकीची आयड्या उद्या सांगतो. त्या दिवशी दिवसभर मी शांतचं होतो, ना मस्ती ना बडबड एकदम शांत झालो होतो. दुस-या दिवशी खरे आणि मी चेंबुर नाक्याच्या सिग्नल जवळ गेलो. बिगारी काम करणा-या महिला लायनीत आपापल्या पाट्या घमेलं घेऊन बसल्या होत्या. मी बबनला म्हणंटलं, बबन आतारे काय करायचं ? तो एका महिलेला म्हणाला, मावशी एक काम आहे करणार का ? वीस रूपये देतो. त्यांनी प्रती प्रश्न केला. कसलं काम ? बबन म्हणाला, हा माझा मित्र अनंत त्याला बाईंनी अभ्यास न केल्या मुळे वर्गा बाहेर काढले आहे. तुम्ही त्याची आई बनून वर्गात चला आणि बाईंना सांगा की, या पूढे नियमित अभ्यास करेल, मस्ती करणार नाही. येवढ्या वेळेस माफ करा पुन्हा असे होणार नाही. त्या बाईने थोडावेळ विचार केला आणि हो म्हणाली. तिला घेऊन आम्ही वर्गावर गेलो. बाई खुर्चीवर बसल्या होत्या. मी म्हटलं. बाई वर्गात येऊ, दर्डावतचं त्या म्हणाल्या आधी शर्ट बरोबर ईन कर, वरचे बटन लाव, आता नवीन मुसिबत, मस्ती करताना वरचे बटन तुटले होते. लावणार कसे, तसेचं हाताने शर्ट धरून वर्गात गेलो. बाई म्हणाल्या, तुमच्या मुलाच्या वह्या पुर्ण नसतात. अक्षर चांगले आहे. मराठी उत्तम वाचतो. गणितात कच्चा आहे. चित्र चांगले काढतो, फक्त अभ्यासाचा कंटाळा आहे. मस्ती करतो. याला शाळा शिकायची की नाही कळत नाही. तुमचे मुलाकडे लक्ष असेल असे वाटत नाही. घरी सुद्धा असाचं वागतो काय ? ती बाई म्हणाली, या वेळेस त्याला वर्गात बसूद्या बाई ह्या नंतर तो मस्ती करणार नाही. व्यवस्थित अभ्यास करील आणि मला दर्डावून म्हणाली परत मस्ती केलीस आणि आभ्यास केला नाहीस तर कानफाड फोडीन, मी खाली मान घालून पायाच्या अंगठ्यांची बोट एकावर एक चढवून दाबत उभा होतो. इतक्यात बाई म्हणाल्या, जा बस बाकावर..!
त्या बाईला येतानांच बबनने वीस रूपये दिले होते. तीही निघून गेली. तो सगळा वृत्तांत मधल्या सुट्टीत मी माझ्या गृहपाटाच्या वहीवर उतरवून काढला. दुस-या दिवशी गृहपाटाची वही पूर्ण केली. सगळा आभ्यास झाल्या मुळे आज बाईंचा मार मिळणार नाही. म्हणून मी खूशीत होतो. पण तो आनंद जास्त वेळ राहीला नाही. बाईंनी गृहपाट पहाताना, मी मागे लिहिलेला वृत्तांत वाचला आणि बाईंची तळ पायाची आग मस्तकात गेली. बे-भान होऊन माझ्या जवळ आल्या. बाईंना येवढे चिडलेले मी केव्हाचं पाहिले नव्हते. माझ्या शर्टला धरून थेट मुख्याध्यापकां समोर उभे केले आणि माझी वही मुख्याध्यापकां पुढे ठेवून सर्व हकिकत सांगितली. मी पार भेदरून गेलो होतो. माझ्या मागून बबनला सुद्धा गचुंडीला धरून आणला. मुख्याधापीका मला म्हणाल्या, एखाद्या कथेला शोभेल अस लिहीलय पण गाढवांनो "आई कधी विकत मिळते का"? थांबा तुम्हाला पोलिसांच्याचं हवाली करते. माझीतर पाचावर धारण बसली. रडूयायला लागलं. मुख्याध्यापिका म्हणाल्या दोघांनीही उद्या आई आणि वडील दोघांनाही घेऊन यायचे, नाहीतर शाळेतून काढून टाकणार. दोघांच्याही पाया खालची वाळूचं सरकली. घरी आलो आईला सर्व सांगितले, आईने खूप मारले. वडीलांना आईने सांगितले त्यांनीही खूप मारले. रात्री जेवन न देता उपाशी झोपवले. दुस-या दिवशी माझे आणि बबनचे दोघांचेही आई वडील शाळेत आले. मुख्याध्यापकांनी माझी वही माझ्या वडीलांना दाखवत म्हणाल्या, पहा तुमच्या मुलाचे प्रताप ह्या वयात येवढे, मोठ्यापनी काय करेल. याची कल्पनाचं न केलेली बरी !
नंतर आंम्हाला वर्गावर जायला सांगितले. आम्ही गेल्या नंतर आई वडीलांशी मुख्याध्यापीकांचं काय बोलनं झालं माहीत नाही. माझी वही घरी आल्यावर वडीलांनी फाडून फेकून दिली आणि काठीने परत खूप मारले. आता रोज वडील अभ्यास घेत होते. नंतर मी हळू हळू बबनचा नाद सोडला.
सहावीतून सातवीत गेलो. सातवीला "आठले बाई" आल्या. आंम्ही दोन-दोन वर्ष नापास झालेलो विद्यार्थी, माझं पुस्तक वाचनाचं वेड पछाडल्या सारख उरावर बसलं होतं. मी रद्दीची दुकानं सुद्धा सोडत नव्हतो. काहीही भेटले की, घेवून यायचे. ट्रेन मधून विदाऊट फिरने नित्त्याचेचं झाले होते. त्या वेळेस भांडूप स्टेशन वेस्टला एक जय लक्ष्मी नावाचे रद्दीचे दुकान होते. मी तेथून तीन पुस्तके विकत घेतली. एक हिटलरचे चरित्र, दुसरे कार्ल मार्क्स आणि दोन पुस्तके पूर्ण लाल कव्हरची छोटी पुस्तके होते. लेनिन आणि एन्गल, ती पुस्तके नंतर माझ्या कडून गहाळ झाली. तेव्हा मी मनाने आंबेडकरी अनुयायीचं होतो. मात्र डाॅ. बाबासाहेबांची पुस्तके वाचली नव्हती. पण आमच्या सिद्धार्थ काॅलनी मध्ये अनेक लेखकांची वक्त्यांची भाषण, व्याख्यान व्हायची, ती ऐकत असतं. त्यातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर हळू हळू कळत होते. त्या काळी मराठवाडा विद्यापीठ नामंतराच्या प्रश्नावर सर्वत्र आंदोलने, मोर्चे, चौक सभा होत असत. आमच्या येथे पँथरची शाखा होती. प्रा. अरूण कांबळे सर (तेव्हा सरांशी ओळख नव्हती) पँथर रामदास आठवले साहेब, आदी नेते आमच्या वस्तीत येत. तेव्हा रामदास आठवलेंना पाहून लय भारी वाटायचं. हातात काळ्या रबराचे कडे, डोक्यावर दाट केस, काळीभोर दाढी, उंच धिप्पाड वाघासारखा माणूस. मंत्रालयावर मोर्चा असला की तो काळा घोडा येथे आडवला जात. तेव्हा आंम्ही सिद्धार्थ काॅलनीतील तीन चारजण एकाचं वर्गात होतो. मोर्चाच्या दिवशी आंम्ही शाळेत असायचो, मग संजय म्हणायचा आपल्या बाबासाहेबाचं नाव विद्यापीठाला मिळालं पाहिजे. काहीपण करून मोर्चाला जायचं. पण प्रश्न असायचा जायचं कसं मग राजूला एक युक्ती सुचली. शाळेच्या खिडकीतून खाली तिघांची दप्तरं फेकायची आणि बाईंना पट्टीपढवून सटकायचं. अस करून आंम्ही शाळेच्या कपड्यावरचं दप्तरासह मोर्चाला जायचो. दुस-या दिवशी वर्गात गेल्यावर "आठले बाईंचा" पारा चढलेलाचं होता. त्या म्हणाल्या इकडे जाळपोळ, तिकडे जाळपोळ, दगडफेक, बंद,
काय त्यांची भाषण, गुंडा सारखे अवतार, हे कसले नेते आणि बाबासाहेब काय स्वतंत्र सैनिक होते काय? आठले बाईंचे असले बोलने ऐकून आंम्हाला खूप राग आला. आंम्ही मुख्याध्यापीकेकडे तक्रार केली. आठले बाईंना समज देण्यात आली. या पुढे असे बोललात तर नोकरी गमवावी लागेल. नंतर त्या आंम्हाला दचकूनचं असायच्या.
यांना आमच्या विषयी येवढा तिरस्कार का ? याचे उत्तर शोधण्यासाठी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेल्या पुस्तकांचे वाचन, चिंतन सुरू झाले. घराच्या भींती आता पुस्तकांच्या भिंती होत आहेत. साहित्या मुळे मला जेष्ठ नाटककार, कवी रंगनाथ कुलकर्णी (दिवंगत) यांचा सहवासही लाभला त्यांच्या आत्मचरित्राचा दादर येथील छबीलदास सभागृहा मध्ये प्रकाशन समारंभ होता. त्या वेळचे सांस्कृतिक मंत्री प्रमोद नवलकर आणि जेष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही या कार्यक्रमास उपस्थित होते. कुलकर्णी सरांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली तेव्हा गोखलेंनी माझी अस्थेने विचारपूस केली. एक कविताही ऐकवायला सांगितली होती. मंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात नेहमी साहित्य विषयक कार्यक्रम असायचे. मी एका काव्य स्पर्धेत भाग घेतला होता. त्या स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मु.म.ग्रंथ संग्रहालयातील सुरेंद्र गावसकर सभाग्रृहात होता. त्या वेळीअभिनेत्री रिमा लागू उपस्थित होत्या. माझा तिसरा नंबर आला होता. त्या वेळी लागू ताईंनी माझ्या कवितेचा उल्लेख करून त्यावर भाष्य केले होते. पँथर प्रा. अरूण कांबळे सर, बलुतकार दया पवार, कामगार कवी नारायण सुर्वे, प्रा. केशव मेश्राम सर, कवी राम मोरे, यांच्या कविता आंम्हाला शाळेत शिकायला होत्या आणि त्यांच्यासह कवीसंमेलनात कविता बोलताना, त्यांच्याकडून कविते विषयी ऐकून घेताना लय भारी वाटायचं, आज मागे वळून पहातानाही साहित्याच्या आभाळाला गवसनी घालणारी महान माणसं आपल्यात नाहीत, याचे फार दुःख होते. लहानपणी वाटायचं आपणही यांच्या सारखं कविता, कथा, लेख, कादंबरी लिहू शकतो काय ?
आणि...
आता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने
माझे हात लिहीते झालेत.
■ अनंत धनसरे ■
आंबेडकरी विचार अभियान
मो. ९९६७७३२७०६
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0