महाज्योतीची अंधारयात्रा

Oct 28, 2025 - 13:49
 0  3
महाज्योतीची अंधारयात्रा

महात्मा जोतिराव फुले हे नाव म्हणजे सामाजिक क्रांतीचे प्रतीक. त्यांनी आयुष्यभर धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्याय, जातिभेद, कर्मकांड, अंधश्रद्धा आणि ब्राह्मणी सत्ताव्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी धर्माच्या नावाखाली समाजावर लादलेल्या गुलामगिरीला “मानसिक गुलामी” म्हटले आणि ती मोडून काढण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग सांगितला. त्यांनी शिक्षण, समता आणि विवेकाधिष्ठित समाज घडवण्यासाठी लढा दिला. “देवभक्तीपेक्षा मानवभक्ती श्रेष्ठ” हा संदेश दिला. अशा महापुरुषाच्या नावाने स्थापन झालेल्या “महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे”च्या (महाज्योती) नवीन इमारतीचे भूमिपूजन अलीकडेच वेदमंत्रोच्चाराने झाले. याच घटनेची झाडाझडती आम्ही या सदरात घेत आहोत.

ही घटना म्हणजे म. फुल्यांच्या क्रांतिकारी विचारांचा अपमान आहे. फुल्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणाऱ्या विचारांची पायाभरणी केली. अशा व्यक्तीच्या नावावर स्थापन झालेल्या संस्थेच्या कार्यक्रमात पुजारी बोलावून वेदमंत्रांचे उच्चारण करणे म्हणजे फुले यांच्या सत्यशोधक परंपरेचा गळा घोटणे होय. आज महात्मा फुल्यांच्या नावाने वेदमंत्रांचा आवाज ऐकू येत असेल तर तो फक्त समाजाच्या मूल्यांच्या अधोगतीचा संकेत नाही तर तो एक त्यांच्या विचारांचा इतिहास पुसण्याचा नियोजित कट आहे, असे आम्हास वाटते.

महाज्योती संस्था ही मागासवर्गीय, विमुक्त आणि भटक्या समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी स्थापन करण्यात आली आहे. त्या संस्थेच्या इमारतीच्या भूमिपूजनासाठी जर वेदमंत्रांचा आधार घेतला जात असेल तर अशा कृतींनी संस्थेच्या उद्दिष्टालाच हरताळ फासला जाणार नाही का? समाजाच्या प्रबोधनासाठी उभारलेल्या संस्थेने जर परत धर्मकर्मकांडाच्या बेड्यांमध्ये स्वतःला बांधून घेतले तर ती संस्था नव्या पिढ्यांना पुन्हा अंधश्रद्धेच्या अंधारात नेणार नाही तर काय?

महात्मा फुले यांनी मूठभर ब्राम्हण्यवादी समाजाच्या धार्मिक वर्चस्वाविरुद्ध पहिला आवाज उठवला. कोणत्याही कार्याप्रसंगी ब्राम्हणांना बोलावले जाई, आजही बोलावले जाते. यासंदर्भात महात्मा फुले म्हणत..

ब्राम्हणांचे इथे नसे प्रयोजन
द्यावे हाकलून | ज्योती म्हणे

फुले दांपत्याने ‘सत्य शोधक समाज’ स्थापन करून धर्मकर्माच्या बंधनातून मानवाला मुक्त करण्याचा प्रयत्न केला. म्हणून जेव्हा महाज्योती संस्थेचे भूमिपूजन पुजाऱ्यांच्या वेदोच्चारांसह केले जाते तेव्हा तो कार्यक्रम महात्मा फुलेंचा नसून, त्यांच्या विचारांच्या प्रतिक्रांतीचा ठरतो. त्यासाठी विवेकशील विचार इथे रुजू नये म्हणून पुन्हा जुन्या धार्मिक कर्मकांडांचा आधार घेतला जातो. हा विरोधाभास नाही का?

म. फुले यांनी ‘तृतीय रत्‍न’, ‘गुलामगिरी’ यांसारख्या ग्रंथांतून धर्माधारित शोषणाची कारणे सांगितली. जी गोष्ट अंधश्रद्धेवर आधारलेली आहे ती ज्ञानावर आधारलेली राहू शकत नाही, हे त्यांचे तत्त्व आजही लागू पडते. समाजोन्नतीसाठी त्यांनी शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले.  अंधश्रद्धेच्या शृंखलेत अडकलेल्या माणसाला स्वतंत्र विचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे धार्मिक कर्मकांडांच्या आहारी गेलेला समाज कधीच प्रगती करू शकत नाही. विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समतेचे मूल्य जोपासणाऱ्या फुले-दांपत्यांच्या चळवळीवर समाजशिक्षणाचा उपक्रम उभा आहे. परंतु, भूमिपूजनातील वेदमंत्रांनी महाज्योतीच्या उद्दिष्टावरच प्रश्नचिन्ह लावले आहे. हा कार्यक्रम देवदेवतांच्या नावाने सुरू करणे म्हणजे फुले विचारांच्या पायावर पुन्हा अंधश्रद्धेचे ओझे ठेवणे होय.

आज समाजात पुन्हा एकदा धार्मिक विधींच्या नावाने जात, वर्चस्व आणि असमानतेचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अशाप्रकारच्या कृतीतून हेच दिसून येते  की शिक्षण, विवेक आणि विज्ञानावर आधारलेला समाज अजून तयार झालेला नाही. या निमित्ताने आम्ही समाजाला विचारत आहोत की आपण फुले यांच्या विचारांच्या मार्गावर चालत आहोत का?  की त्यांच्या नावानेच त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अपमान करत आहोत? महात्मा फुले यांचा वारसा म्हणजे समानतेसाठीचा आणि विवेकासाठीचा संघर्ष आहे. या वारशावर वेदमंत्रांचे सावट पडू दिले तर पुढील पिढ्या पुन्हा अंधारात जाणार नाहीत का?

फुले विचार फक्त भक्तीच्या विरोधात नव्हते तर सामाजिक पातळीवरील समतेसाठीचा संघर्ष होते. त्यांनी ब्राह्मण्यवादी धार्मिक विचारांचे खंडन करताना सर्व पिढ्यांसाठी समतेचा नवा अध्याय घालून दिला. त्यांच्या सत्यशोधक समाजाने देवाचा नव्हे, तर माणसाचा शोध घ्यायला शिकवले. आज सरकार पुरस्कृत सामाजिक संस्थाच जर या विचारांकडे पाठ फिरवत असतील तर ते समाजासाठी घातक ठरते. यामुळे पुढील तीन गोष्टींचा धोका निर्माण होतो -
१. शिक्षणात विवेकापेक्षा कर्मकांडांना स्थान मिळेल
२. समाजातील मागास घटक पुन्हा धार्मिक बडव्यांच्या छायेखाली जातील
३. फुले-दांपत्यांनी दिलेल्या विवेकी स्वातंत्र्याचा पाया दुर्बल होईल

सामाजिक प्रक्रियांमध्ये विचारांचा विसर किती सहज होतो याची प्रचिती या प्रसंगातून आपल्याला येते. सरकार आणि महाज्योतीला याची आठवण दिली पाहिजे की महात्मा फुले हे केवळ नाव नाही तर ते सामाजिक क्रांतीचे प्रतीक आहेत. त्यांच्याच नावाने उभारलेल्या संस्थेत धार्मिक कर्मकांड विधी करणे म्हणजे विचारशून्य अंधश्रद्धेची पुनर्स्थापना करणे होय. जर ही चूक तात्काळ दुरुस्त केली नाही तर भावी पिढ्यांपुढे आपण अंधश्रद्धेचा मार्ग मोकळा करून देत आहोत, असे होईल. त्यामुळे भूमिपूजन असो वा महाज्योतीसारखे कोणतेही राष्ट्रीय शासकीय कार्य असो, फुले विचारांचा आदर राखायचा असेल, तर प्रत्येक कृती त्यांच्या विचारसरणीशी सुसंगत असायला हवी. कारण बाबुराव बागुल आपल्या "वेदाआधी तू होतास..." या कवितेत माणसाला व त्याच्या विकासाला प्राधान्य देताना म्हणतात,

हे माणसा,
तूच सूर्याला सूर्य म्हटलेस
आणि सूर्य, सूर्य झाला
तूच चंद्राला चंद्र म्हटलेस
आणि चंद्र, चंद्र झाला
अवघ्या विश्वाचे नामकरण
तूच केलेस
अन् प्रत्येकाने मान्य केले
हे प्रतिभावान माणसा,
तूच आहेस सर्व काही
तुझ्यामुळेच संजीव सुंदर
झाली ही मही.

आपण वेळीच जागे झालो नाही तर ही महाज्योतीची अंधारयात्रा ठरेल. जागे व्हा !

- प्रा. उत्तन भगत, मुंबई (मो. 9322282056)

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0