मिरा भाईंदर मध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांचे तात्काळ सर्वेक्षण

Jul 2, 2026 - 22:09
 0  45
मिरा भाईंदर मध्ये पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांचे तात्काळ सर्वेक्षण

निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही – आयुक्त राधाबिनोद शर्मा

भाईंदर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा यांनी शहरातील धोकादायक व अवास्तव वाढलेल्या झाडांचे तात्काळ सर्वेक्षण करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश उद्यान विभागाला दिले आहेत.

मुंबई येथे नुकत्याच झाड कोसळून एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत, मिरा - भाईंदर शहरात भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडू नये तसेच पावसाळा आणि वादळी हवामानाच्या काळात नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या अनुषंगाने आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना शहरातील सर्व धोकादायक झाडांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वेक्षणादरम्यान झाडांची सद्यस्थिती तपासून संबंधित झाड मुळासकट हटविणे आवश्यक आहे की केवळ धोकादायक फांद्यांची छाटणी करणे पुरेसे आहे, याबाबत तांत्रिक निकषांच्या आधारे वर्गीकरण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सर्वेक्षणादरम्यान प्रत्येक धोकादायक झाडाचे स्पष्ट छायाचित्र घेऊन त्याची नोंद ठेवण्याचे तसेच शक्य असल्यास जीपीएस टॅगिंगसह छायाचित्रे संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे भविष्यातील कार्यवाही अधिक प्रभावी, पारदर्शक आणि दस्तऐवजीकरणाच्या दृष्टीने सक्षम होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आयुक्तांनी संबंधित विभागांना सर्वेक्षण पूर्ण करून धोकादायक झाडांची संख्या, त्यांचे स्थान, प्रस्तावित कार्यवाही आणि प्राधान्यक्रमानुसार करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हे काम अत्यंत आपत्कालीन स्वरूपाचे असल्याने कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा, हलगर्जीपणा किंवा दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी दिला आहे. दुर्लक्षामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरून त्यांच्याविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मिरा-भाईंदर महानगरपालिका पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक झाडे, नाले, जलनिस्सारण व्यवस्था तसेच आपत्कालीन यंत्रणा सतत कार्यरत ठेवत असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात धोकादायक स्थितीत असलेले वृक्ष अथवा झाडांच्या फांद्या आढळल्यास त्याची माहिती तात्काळ महानगरपालिकेला देऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0