सामाजिक समता सप्ताहानिमित्त ठाण्यात भव्य 'महिला मेळावा' संपन्न

Apr 14, 2026 - 13:23
 0  0
सामाजिक समता सप्ताहानिमित्त ठाण्यात भव्य 'महिला मेळावा' संपन्न

ठाणे : अनुसूचित जाती, जमाती आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संपूर्ण राज्यात 8 ते 14 एप्रिल दरम्यान 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह' मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच सप्ताहाचे औचित्य साधून ठाण्यातील दत्तवाडी, खारीगाव येथील सामाजिक न्याय भवनात भव्य 'महिला मेळावा' आयोजित करण्यात आला होता.

            या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे आणि समाजात जनजागृती निर्माण करणे हे होते. कार्यक्रमाला ठाणे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, वरिष्ठ निरीक्षक मीरा आगळे, तसेच कार्यालयातील कर्मचारी आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

          कार्यक्रमादरम्यान बार्टीच्या समतादूत रेश्मा साळवे यांनी उपस्थित महिलांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेले ऐतिहासिक कार्य आणि भारतीय संविधानातील महिलांसाठी असलेल्या विशेष तरतुदींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संविधानामुळे महिलांना मिळालेले हक्क आणि त्यांच्या प्रगतीचे मार्ग यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे  महिला बाबतचे योगदानबाबत डॉ.स्वप्ना समेळ  यांनी व्याखान दिले. व श्रीकांत बागूल यांनी महात्मा ज्योतिबा फुले व महाड येथील चवदार तळे सत्याग्रह बाबतची या कार्यक्रमप्रसंगी उपस्थितींना माहिती दिली.

            मेळाव्याची सांगता भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेच्या सामूहिक वाचनाने झाली. यावेळी सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. उपस्थित महिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची सखोल माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत महाराष्ट्र शासन व आयोजकांचे आभार मानले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बार्टीच्या प्रकल्प अधिकारी मेघा पवार यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0