वसई विरार मनपा क्षेत्रात मतदान करणाऱ्या नागरिकांना मतदानाच्या दिवशी मिळणार विविध सवलत

Jan 7, 2026 - 22:13
 0  3
वसई विरार मनपा क्षेत्रात मतदान करणाऱ्या नागरिकांना मतदानाच्या दिवशी मिळणार विविध सवलत

हॉटेल्स बिलांमध्ये व रिक्षा, बस भाड्यांमध्ये विशेष सूट

विरार : वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ कार्यक्रमाअंतर्गत दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. यावेळी आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री.मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढून मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून मतदान करावे यादृष्टीने जनजागृती अभियानासोबतच विविध विशेष सवलत योजना राबविल्या जात आहेत. दिनांक ०७ जानेवारी २०२६ रोजी आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व पुढाकाराने महानगरपालिका क्षेत्रातील हॉटेल्स असोसिएशन, रिक्षा युनियन तसेच मनपा परिवहन सेवा यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महानगरपालिका मुख्यालयात बैठक संपन्न झाली. 

निवडणूक हा लोकशाहीचा एक उत्सव आहे, मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून या उत्सवात मोठ्या प्रमाणात आपला  सहभाग नोंदवावा या उद्देशाने वसई विरार शहर महानगरपालिका मतदानाच्या दिवशी मतदान करणाऱ्या मतदारांना हॉटेल्सच्या बिलांमध्ये, रिक्षा व बस प्रवासभाड्यामध्ये सूट देणेबाबत सदर बैठकीत मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत उपस्थित असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यात आले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिका निवडणूकीत दि.१५ जानेवारी २०२६ रोजी मतदान करणाऱ्या मतदारांना सदर मतदानाच्या दिवशी हॉटेलच्या बिलामधून १५% सूट देण्याचे जाहीर केले. याचप्रमाणे शहरातील रिक्षा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही दि.१५ जानेवारी २०२६ रोजी मतदान करणाऱ्या मतदारांना सदर मतदानाच्या दिवशी रिक्षा भाड्यामध्ये ५०% सूट देत असल्याचे जाहीर केले. त्याचप्रमाणे मनपा परिवहन विभागामार्फतही मतदान करणाऱ्या मतदारांना बस भाड्यामध्ये विशेष सूट देण्यात येणार आहे. तसेच केशकर्तनालय असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांही सदर दिवशी मतदान करणाऱ्या मतदारांना दरात विशेष सूट देणार असल्याचे सांगितले. 

ही सूट केवळ दि.१५ जानेवारी २०२६ या दिवशीच देण्यात येणार असून मतदान करणाऱ्या मतदारांनाच मिळणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदारांनी मतदान करून या सवलतींचाही लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी उपस्थित असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (निवडणूक) श्री.संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त श्री.दिपक सावंत, उप-आयुक्त श्री.अजित मुठे, उप-आयुक्त (निवडणूक) श्रीम.स्वाती देशपांडे, हॉटेल असोसिएशन, रिक्षा असोसिएशन, मनपा परिवहन चे पदाधिकारी उपस्थित होते. मतदानाच्या दिवशी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सर्व मतदारांनी मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्री. मनोजकुमार सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0