काशीगाव मेट्रो स्थानकाजवळ पदपथावर फेरीवाल्यांचा कब्जा; चार कोटींची तरतूद तरी कारवाईचा अभाव
फेरीवाले हटविण्यासाठी वाहन व मजूर पुरवठ्यावर कोट्यवधींचा खर्च; पादचाऱ्यांसाठी पदपथच गायब
मिरारोड : मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित व सुलभ वाहतूक सुविधा मिळाव्यात, यासाठी रस्ते आणि पदपथ उभारण्यासाठी महानगरपालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, शहरातील अनेक भागांत या पदपथांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष म्हणजे, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सन २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात अनधिकृत फेरीवाले हटविणे तसेच त्यासाठी वाहन व मजूर पुरवठा करण्यासाठी तब्बल ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एवढी मोठी आर्थिक तरतूद असतानाही प्रत्यक्षात शहरातील प्रमुख पदपथांवरील अतिक्रमणे कायम राहत असतील, तर फेरीवाला कारवाईसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च नेमका कितपत परिणामकारक ठरतो, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काशीगाव मेट्रो परिसरात पदपथावर अतिक्रमण
काशीगाव मेट्रो स्थानकाजवळील प्लेझंट पार्क कॉर्नर परिसरात पदपथावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पादचाऱ्यांना पदपथाचा वापर करता येत नसून त्यांना थेट रस्त्यावरून चालावे लागत आहे. या परिस्थितीमुळे या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होण्याबरोबरच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पदपथ नागरिकांच्या वापरासाठी असताना त्यावर अतिक्रमण झाल्याने महानगरपालिकेने केलेला पदपथ विकासाचा खर्चही निष्फळ ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
फेरीवाला पथकाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
काशीगाव परिसरातील या परिस्थितीमुळे संबंधित प्रभागातील फेरीवाला पथकाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. फेरीवाल्यांवर नियमित कारवाई होत नसल्याने त्यांना कोणाचे संरक्षण आहे का, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.फेरीवाला पथक प्रमुख मुरली पाटील यांच्याकडून या परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर अपेक्षित कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
चार कोटींच्या तरतुदीचा उपयोग कुठे?
एकीकडे अनधिकृत फेरीवाले हटविण्यासाठी वाहन व मजूर पुरवठ्यावर ४ कोटी रुपयांची तरतूद, तर दुसरीकडे मेट्रोसारख्या गर्दीच्या परिसरातील पदपथांवर फेरीवाल्यांचा कब्जा कायम असल्याचे चित्र दिसत असल्याने महानगरपालिकेच्या कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
महानगरपालिकेने काशीगाव मेट्रो परिसरातील पदपथ तातडीने अतिक्रमणमुक्त करून पादचाऱ्यांसाठी खुला करावा, तसेच फेरीवाला कारवाईसाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीचा प्रत्यक्षात किती आणि कसा वापर झाला, याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पदपथ नागरिकांसाठी की फेरीवाल्यांसाठी? आणि फेरीवाले हटविण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करूनही अतिक्रमणे कायम राहत असतील, तर या खर्चाची जबाबदारी निश्चित होणार का? असा सवाल आता मिरा-भाईंदरकरांकडून उपस्थित केला जात आहे.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0