ठाणे जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त करण्याचा प्रशासनाचा निर्धार

May 5, 2026 - 16:44
 0  12
ठाणे जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त करण्याचा प्रशासनाचा निर्धार

ठाणे: ठाणे जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी केवळ एका विभागाने नाही, तर सर्वच शासकीय विभागांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे काम करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आयोजित 'जिल्हा नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर' (NCORD) समितीच्या बैठकीत बोलताना केलं.

    या बैठकीत डॉ. माने यांनी पोलीस, महसूल, आरोग्य आणि उत्पादन शुल्क विभागाला स्पष्ट निर्देश दिले की, अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी या सर्व यंत्रणांनी एकमेकांशी माहितीची देवाणघेवाण करून संयुक्त कारवायांचा वेग वाढवावा. तस्करीच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्यावा.

     अंमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचविण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयीन परिसरामध्ये जनजागृती मोहिमांचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, जिल्ह्यातील व्यसनमुक्ती केंद्रांना आवश्यक ते तांत्रिक सहकार्य आणि मार्गदर्शन प्रशासनामार्फत उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

    या बैठकीला ठाणे शहर पोलीस उपअधीक्षक श्रीमती भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र निकम, समीर शेख, सहायक पोलीस निरीक्षक लहू सातपुते यांच्यासह औद्योगिक सुरक्षा, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद समाज कल्याण, कृषी, केंद्रीय वस्तू व सेवा कर (GST), टपाल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    ठाणे जिल्ह्याला अंमली पदार्थमुक्त करण्याचा निर्धार केला असून त्या दिशेने जिल्हा प्रशासनाने उचललेले हे एक निर्णायक पाऊल असून, भविष्यातील रणनीतीवरही या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0