अहंकारी रावणाची लंका पेटवून विकासाचा भगवा फडकवणार

Jan 5, 2026 - 16:37
 0  6
अहंकारी रावणाची लंका पेटवून विकासाचा भगवा फडकवणार

मंत्री प्रताप सरनाईक यांची आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर जोरदार टिका 

मिरा-भाईंदरचा महानगरपालिका निवडणुकीचा शिवसेनेचा 'वचननामा' जाहीर

'विकासाचे व्हिजन प्रताप सरनाईकांचे मिशन'

मीरारोड : गेल्या १० वर्षांपासून महापालिकेवर बसलेल्या भस्मासुराचा अंत करण्याची वेळ आली असून, अहंकारी आणि भ्रष्टाचारी रावणाची लंका हा हनुमान जाळल्याशिवाय राहणार नाही," अशा शब्दांत सरनाईक यांनी भाजपाचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते 'विकासाचे व्हिजन प्रताप सरनाईकांचे मिशन' हे घोष वाक्य असलेला वचननामा पत्रकार परिषदेत प्रकाशित केला त्यावेळ बोलत होते.

मिरा-भाईंदरच्या रणसंग्रामात शिवसेनेने ८१ शिलेदार मैदानात उतरवले आहेत. या वचननामा मध्ये सरनाईक यांनी 'काम काय केले आणि आता काय करणार' यावर भर दिला आहे. जाहीर करण्यात आलेल्या वचननाम्यात ९०% पूर्ण झालेली विकासकामे आणि उर्वरित प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. "आम्ही केवळ हवेत किल्ले बांधत नाही, तर वास्तवात उतरवतो," असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले कि, " मिरा-भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये शिवसेना पक्ष स्वतंत्रपणे लढत असून शिवसेनेचे ८१ शिलेदार महानगपालिकेवर विजयाचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज आहेत. १५ जानेवारी २०२६ ला महानगरपालिकेचे मतदान असून याचं पार्श्वभूमीवर आज मिरा-भाईंदर शहराच्या विकासाचा वचननामा मी जाहीर केला असून महत्त्वाची गोष्ट म्हणजे *विकासाचे व्हिजन हेच प्रताप सरनाईक यांचे मिशन, आता होणार मिरा-भाईंदरचे ट्रान्सफॉरमेशन* या उद्देशाने यंदा मिरा-भाईंदरच्या विकासाचा वेग डब्बल होणार आहे. आनंद या गोष्टीचा आहे कि मी इतर पक्ष नेत्यांप्रमाणे काय काम करणार याचा वचननामा जाहीर न करता ९०% झालेल्या गोष्टी आणि काही पूर्णत्वास असलेल्या विकासकामांचा वचननामा जाहीर करत आहे. ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या तत्त्वावर मी गेल्या १६ वर्षांपासून शहराची सेवा करत आहे. प्रताप सरनाईक जो बोलतो ते करून दाखवतो, हा इतिहास आहे. १५ जानेवारीला जनताच भ्रष्टाचारी सत्तेचे दहन करेल आणि महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवेल असा मला ठाम विश्वास आहे.  मी केलेल्या विकासकार्यांवर विश्वास ठेवून जनता मला महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची संधी देईल आणि जर हि संधी मला मिळाली तर नक्कीच मिरा-भाईंदर शहर हे येत्या काळात अधिक विकसित, सुंदर, स्वच्छ आणि स्वप्नातील शहर बनल्याशिवाय राहणार नाही हा माझं शब्द आहे.”

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0