उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव

Sep 8, 2026 - 16:47
 0  9
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा ‘जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरव

ठाणे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि सर्वसमावेशक शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ करण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत जिल्हा परिषद, ठाणेच्या शिक्षण विभागामार्फत शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला, दि. ०४ सप्टेंबर, २०२६ रोजी बी. जे. हायस्कुल येथे  ‘जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७’ सोहळा उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, उपशिक्षणाधिकारी संदीप पाटील, नगरसेवक विकास पाटिल, उपशिक्षणाधिकारी कुंदा पंडीत, शुभांगी बढे,  विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजाराव, जिल्हा समन्वयक अनिल कुर्हाडे यांच्यासह सर्व गट शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी- कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा, सोनाळे येथील विद्यार्थ्यांनी ईशस्तवन सादर केले.

पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करताना जिल्हा परिषद, ठाणेच्या वतीने भविष्यातही विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हा परिषद, ठाणे शिक्षण विभागामार्फत आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये अंबरनाथ तालुक्यातील जि. प. शाळा मामूची वाडी केंद्र पिंपळोळी येथील प्राथमिक शिक्षक छाया संजय  कोकंदे, भिवंडी तालुक्यातील जि. प. शाळा देवरुंग केंद्र शिवनगर येथील पदवीधर शिक्षक सुभाष गोविंद पाटील, कल्याण तालुक्यातील जि. प. शाळा घोटसई केंद्र गोवेली येथील प्राथमिक शिक्षिका रंजना प्रकाश टेंभे, मुरबाड तालुक्यातील जि. प. शाळा खेडले तळवली केंद्र खेवारे महाज येथील प्राथमिक शिक्षक तानाजी धर्मा जाधव तसेच शहापूर तालुक्यातील जि. प. शाळा कळगाव केंद्र दहिवली येथील पदवीधर शिक्षक वैभव गणपत मांजे यांचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या शिक्षकांनी केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरले आहे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजाराव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र तरे यांनी केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि विविध शैक्षणिक संधी उपलब्ध करून देत ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण – सक्षम विद्यार्थी – उज्ज्वल भविष्य’ या दिशेने जिल्हा परिषद, ठाणेचा शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा करण्यात आलेला हा गुणगौरव निश्चितच इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0