क्रांती दिनी मीरा-भाईंदरच्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन, शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवघर नाका येथील स्मारकाला दिली मानवंदना

Aug 9, 2026 - 14:26
Aug 9, 2026 - 14:30
 0  12
क्रांती दिनी मीरा-भाईंदरच्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन, शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवघर नाका येथील स्मारकाला दिली मानवंदना

भाईंदर : ९ ऑगस्ट हा दिवस देशभरात क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. स्वातंत्र्यलढ्यात मीरा-भाईंदर परिसरातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या योगदानाची आठवण जागवण्यासाठी शंकर नारायण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नवघर नाका येथील मीरा-भाईंदर स्वातंत्र्यसैनिक स्मारकास भेट देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.

या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी देशाच्या इतिहासाची आणि स्वातंत्र्यलढ्याची माहिती आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

मीरा-भाईंदर परिसरातील नवघर, गोडदेव, खारीगाव, भाईंदर गाव, उत्तन आदी भागांतील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिश सत्तेविरोधातील लढ्यात सहभाग घेतला. काहींनी महात्मा गांधींच्या अहिंसात्मक मार्गाचा अवलंब केला, तर काहींनी क्रांतिकारी मार्ग स्वीकारला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढताना त्यांनी आपल्या कुटुंबाची, संपत्तीची किंवा वैयक्तिक सुखाची पर्वा केली नाही. अनेकांनी तुरुंगवासही भोगला.

या स्वातंत्र्यसैनिकांपैकी अनेकांचे योगदान काळाच्या ओघात दुर्लक्षित राहिले. मात्र, तुरुंगातील कागदपत्रे, पोलीस ठाण्यातील नोंदी तसेच तत्कालीन सरकारी दस्तऐवजांच्या आधारे परिसरातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांची नावे समोर आली आहेत. या सर्व स्वातंत्र्यवीरांची नावे नवघर नाका येथे उभारण्यात आलेल्या स्वातंत्र्यसैनिक स्मारकावर कोरलेली आहेत.

या महान स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांच्या त्यागाची जाणीव पुढील पिढीला व्हावी, या उद्देशाने शंकर नारायण महाविद्यालयातर्फे दरवर्षी क्रांती दिनी स्मारकस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाच्या कार्यक्रमालाही स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

यावेळी स्वातंत्र्यसैनिक कुटुंबीयांचे प्रतिनिधी तुळशीदास रामचंद्र पाटील, निर्भय भारत संघटनेचे अध्यक्ष अंकुश मालुसरे, नवघर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सावजी, तसेच सुभाष किणी, भूषण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्रसेना (NCC) तसेच अन्य विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले. प्राचार्य डॉ. विष्णू यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंदही उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.

महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या आयोजनाची प्रमुख जबाबदारी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुनील धापसे, डॉ. राजेंद्र वटकर, प्रा. अजित जाधव तसेच सहशिक्षक निमेश पाटील यांनी सांभाळली.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0