राज्यातील सर्वात मोठ्या 50 बेड्स क्षमतेच्या नमुंमपा डायलिसीस सेंटरची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी

May 11, 2026 - 20:32
 0  3
राज्यातील सर्वात मोठ्या 50 बेड्स क्षमतेच्या नमुंमपा डायलिसीस सेंटरची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी

नवी मुंबई : शरीरातील मूत्रपिंडांची अर्थात किडनीची कार्यक्षमता अत्यंत कमी झाल्यानंतर डायलिसीस करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. सर्वसाधारपणे एक वेळेच्या डायलिसीसला 3000 ते 3500 इतका खर्च येतो व आठवड्यातून 2 ते 3 वेळा डायलिसीस करावे लागले तर सर्वसाधारण रूग्णाला हा खर्च करणे आवाक्याबाहेर होते. ही परिस्थिती लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी सेक्टर 14 येथील विवेकानंद सांस्कृतिक केंद्र इमारतील 50 बेड्स क्षमतेचे स्पेशल डायलिसीस सेंटर सुरू केले असून एकाच छताखाली इतक्या मोठ्या संख्येने डायलिसिस बेड्स उपलब्ध असणारे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे डायलिसिस सेंटर आहे.
          महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पाहणी करीत त्याठिकाणी उपलब्ध असलेल्या विनामूल्य डायलिसिस सुविधेचा जास्तीत जास्त गरजू नागरिकांना उपयोग व्हावा यादृष्टीने या डायलिसीस सेंटरची माहिती जास्तीत जास्त प्रसारित करण्यावर भर देण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे, उद्यान विभाग उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.  
          राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) कार्यक्रमातील एनसीडी (NCD - Non-Communicable Diseases) अभियान अंतर्गत हे 30 वर्षांवरील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याची माहिती देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या तपासणीव्दारे प्राधान्याने मधुमेह (Diabetes), उच्च रक्तदाब (Hypertension), कर्करोग (Cancer - स्तन, गर्भाशय, मुख), हृदयविकार आणि स्ट्रोक यांसारख्या आजारांचे लवकर निदान करणे, त्यांना प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने उपचार सुविधा उपलब्ध करून देणे हा उद्देश नजरेसमोर ठेवण्यात आलेला आहे असे सांगितले. 
           सध्या मधुमेहाचे प्रमाण खूप वाढल्याचे दिसत असून त्यादृष्टीने डायलिसिसची वाढती गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेने या स्पेशल डायलेसिस सेंटरमध्ये एकाच छताखाली 50 तसेच महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयात 10, नेरूळ रूग्णालयात 11, ऐरोली रूग्णालयात 11 तसेच सेक्टर 8 सीबीडी बेलापूर येथील सेंटरमध्ये 3 अशाप्रकारे एकूण 85 बेड्सची डायलिसीस सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यामुळे डायलिसीसची गरज असणा-या सर्वसामान्य नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला असून जानेवारीपासून सुरू केलेल्या या स्पेशल सेंटरचा लाभ आत्तापर्यंत 1 हजारहून अधिक डायलिसिस आवश्यक असणा-या रूग्णांनी घेतला असल्याचे सांगितले. 
          वाशी सार्वजनिक रूग्णालयात एमआरआय व कॅथलॅब सुविधा तसेच सीएसएसडी, मॉड्युलस मॉर्च्युरी, मिल्क बँक अशाही महत्वाच्या सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी महानगरपालिका आरोग्य सुविधांच्या गुणवत्ता आणि क्षमता वाढीवर भर देत असून प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाचे आव्हान दूर करण्यासाठी नियोजनबध्द पावले उचलली जात असल्याचे सांगितले.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0