मिरा भाईंदर महापौरांच्या 'झिरो टॉलरन्स' आदेशाला प्रभाग अधिकाऱ्यांनी दाखवली 'केराची टोपली'

Aug 25, 2026 - 14:25
Aug 25, 2026 - 14:34
 0  22
मिरा भाईंदर महापौरांच्या 'झिरो टॉलरन्स' आदेशाला प्रभाग अधिकाऱ्यांनी दाखवली 'केराची टोपली'

प्रभाग कार्यालय क्रमांक 6 मध्ये अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचे उभे राहत आहे साम्राज्य 

आयुक्त साहेब! उघडा डोळे, बघा निट !

मिरारोड : मिरा भाईंदर मनपा क्षेत्रात मागील काही दिवसांत अनेक आगीच्या घटना समोर आल्या. काही लोकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये अनधिकृत  बांधकामांबाबत प्रश्न उपस्थित केला गेला. अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामांचे न होऊ देण्याच्या कडक सूचना दिल्या गेल्या, महापौर डिंपल विनोद मेहता यांनी अनधिकृत बांधकाम प्रकरणी 'झिरो टॉलरन्स' चे आदेश दिले, तरी देखील मिरा भाईंदर महानगरपालिका प्रभाग समिती कार्यालय क्रमांक 6 मध्ये अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य उभे राहत आहे. विशेष म्हणजे व्यवसायिक अनधिकृत शेड, कारखाने, दुकाने बेधडक थाटली जात आहेत. 

विशेषतः प्रभाग समिती कार्यालय क्रमांक ६च्या हद्दीत व्यवसायिक स्वरूपाच्या अनधिकृत शेड, कारखाने, दुकाने तसेच अन्य बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. एकीकडे अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे आदेश दिले जात असताना दुसरीकडे मोठ्या स्वरूपाची बांधकामे सुरूच राहत असतील, तर प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

गरीबांच्या झोपड्यांवर तातडीने कारवाई आणि मोठ्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष? असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नियम सर्वांसाठी समान असतील, तर कारवाईमध्येही कोणताही भेदभाव असता कामा नये, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

प्रभाग कार्यालयाकडे अनधिकृत बांधकामांबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याचे सांगितले जाते. मात्र, तक्रारी करूनही संबंधित बांधकामांवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. काही अनधिकृत बांधकामांना संबंधित अधिकाऱ्यांचे संरक्षण अथवा अभय मिळत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. या आरोपांची प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.

शहरात अनधिकृत बांधकामांमुळे अग्निसुरक्षा, वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केवळ आदेश काढून न थांबता त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.

महापौरांचा ‘झिरो टॉलरन्स’चा आदेश जर प्रत्यक्षातही तितकाच कठोर असेल, तर प्रभाग समिती क्रमांक ६ मध्ये सुरू असल्याचा आरोप असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी होणार? असा थेट सवाल नागरिक करत आहेत.

दरम्यान, मनपाचे आयुक्त राधाबीनोद शर्मा यांना “आयुक्त साहेब, उघडा डोळे, बघा नीट!” असे आवाहन करत नागरिकांनी प्रभाग समिती क्रमांक ६च्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0