'विश्वास' घातकी पाटील आणि कमी बुद्धीचे लोक

Sep 11, 2025 - 20:40
 0  13
'विश्वास' घातकी पाटील आणि कमी बुद्धीचे लोक

विश्वास पाटील हे पानिपत, पांगिरा, झाडाझडती, संभाजी, महानायक इ. कादंबऱ्या लिहून नावारूपास आलेले लेखक आहेत. आय.ए.एस. अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत म्हटले की, "आरक्षणामुळे कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं." त्यांच्या याच विधानाची त्यांच्याच  भाषेत आज आपण या सदरात झाडाझडती घेणार आहोत.

त्यांचे हे विधान केवळ व्यक्तिस्वातंत्र्याच्या सीमेत येत नाही, तर समाजातील वंचित घटकांविषयी असलेल्या खोलवरच्या पूर्वग्रहांचे ते द्योतक आहे. यावर गंभीर चर्चा होणे आवश्यक आहे. भारतामध्ये आरक्षण ही केवळ सामाजिक न्यायाची तरतूद नसून ऐतिहासिक विषमतेची दुरुस्ती करण्याची व्यवस्था आहे. हजारो वर्षे दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय समाज वंचित ठेवण्यात आला. शिक्षण, जमीन, सत्ता व प्रतिष्ठेच्या दारात त्यांना प्रवेश नाकारला गेला. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात आरक्षण देऊन समानता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेच्या अन्यायाची भरपाई करण्यासाठी आरक्षणाची गरज मांडली. त्यामुळे आरक्षण हे दान नाही, तर हक्क आहे.

आरक्षणाचा लाभ घेणारे लोक कमी बुद्धीचे असतात, हा आरोप केवळ उच्चवर्णीय अहंकारातून आलेला आहे. प्रतिभा, मेहनत आणि कर्तृत्व हे केवळ एका जातीच्या मक्तेदारीत नसते. आय.ए.एस., आय.पी.एस., डॉक्टर, अभियंते, संशोधक अशा अनेक क्षेत्रांत आरक्षणाच्या माध्यमातून आलेल्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे.

जर आरक्षणामुळे "कमी बुद्धीचे" लोक प्रशासनात आले असते, तर देशाच्या विकासाची चाके फिरली नसती. उलट, अनेक उदाहरणे सांगता येतील जिथे वंचित घटकातील अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे व कर्तबगारीने काम केले आहे.

विश्वास पाटील यांच्या विधानात एक प्रकारची सत्ताकेंद्री मानसिकता दडलेली आहे. प्रशासकीय व्यवस्थेत वरिष्ठ–कनिष्ठ अशी संरचना असते. कुणाच्याही हाताखाली काम करणे हे नोकरशाहीचा स्वाभाविक भाग आहे. मग ते कनिष्ठ अधिकारी कोणत्या समाजातून आले आहेत यावरून त्रागा करण्याचा अधिकार कुणालाच नाही. उलट, खऱ्या अर्थाने लोकशाही व्यवस्थेत विविध स्तरांतून आलेले लोक प्रशासनात एकत्र काम करतात, हेच तिचे बलस्थान आहे.

साहित्यिक हा केवळ लेखक नसतो; तो समाजाचा मार्गदर्शक, विचारप्रवर्तक आणि संस्कृतीचा संवाहक असतो. विशेषतः विश्वास पाटील यांसारख्या लोकप्रिय (?) कादंबरीकारांकडून जबाबदारीची अपेक्षा असते. त्यांच्या कडून समाजाला जोडणारे, समतेचे भान देणारे विचार अपेक्षित आहेत. पण त्यांनी केलेले विधान समाजातील तणाव वाढवणारे आहे.

प्रत्येक्षात आरक्षणावर हल्ला हा सामाजिक वर्चस्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न असतो. कारण आरक्षणामुळे उच्चवर्णीयांची एकछत्री मक्तेदारी तुटते, स्पर्धा निर्माण होते आणि पारंपरिक सत्ता रचनेला आव्हान मिळते. त्यामुळे काहींना ही बाब असह्य होते. "कमी बुद्धी" असा ठपका ठेवणे ही त्यांची असमाधानी मानसिकता लपविण्याची पद्धत आहे.

आरक्षणाबद्दल खरा विचार करायचा असेल तर तो गुणवत्ता वाढविणे, सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे आणि शिक्षण व रोजगारात विषमता कमी करणे याबाबत असायला हवा. पण ते टाळून जेव्हा सार्वजनिकरित्या वंचित समाजावर अवमानकारक विधान केले जाते, तेव्हा ते सामाजिक सलोख्याला धक्का देणारे ठरते.

विश्वास पाटील यांचे विधान हे केवळ व्यक्तीगत मत म्हणून पाहता येणार नाही. ते समाजातील खोलवर रुजलेल्या जातीय अहंकाराचे दर्शन घडवते. साहित्यिक व प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीकडून अशा शब्दांची अपेक्षा नव्हती. कारण आरक्षण ही कुणाची दया नव्हे तर समतेच्या मूल्यांची पुनर्स्थापना करण्यासाठीचा तो एक सामाजिक अधिकार आहे.

लेखक : प्रा. उत्तम भगत 

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0