ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स जनजागृतीचा संदेश

Nov 11, 2025 - 13:57
 0  1
ठाण्यात सायकल राईडमधून एचआयव्ही-एड्स जनजागृतीचा संदेश

ठाणे : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा सामान्य रुग्णालय, ठाणे आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी एचआयव्ही-एड्स आणि सिफिलीस बाबत युवकांमध्ये जनजागृतीपर सायकल राईड आयोजित करण्यात आली होती. या सायकल राईडमध्ये पाच वर्षे वयोगटापासून ते ७७ वर्षापर्यंतच्या ज्येष्ठांपर्यंत २८७ सायकल प्रेमींनी सहभाग घेतला.

     सर्व सायकल प्रेमींनी आम्हा सगळ्यांना एक शिकवण दिली की, आपण सकाळी लवकर उठून फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे, त्यामुळे त्यांच्याकडे पाहून एक नवीन ऊर्जा मिळाली. अनेकांना एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्स हे दोन शब्द उच्चारले की भीती वाटते. पूर्वी या आजाराबद्दल अत्यंत भीती होती मात्र जनजागृतीमुळे ही भीती दूर झाली, असे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी व्यक्त केले.

    सकाळी मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सायकल राईडला सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पवार पुढे म्हणाले की, सर्व सायकल प्रेमींना पाहून आजची सकाळ ही अत्यंत उत्साही आणि ऊर्जा देणारी होती. जसा आता क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग वाढत चालला आहे तसाच सायकलिंग मध्ये देखील महिलांचा सहभाग वाढला पाहिजे. कारण त्यांच्या सहभागाशिवाय प्रत्येक क्षेत्र अपूर्णच आहे. अनेकांना एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्स याबद्दल संभ्रमता आहे परंतु या दोन्ही आजारांमध्ये मोठा फरक आहे. आपली वाटचाल ही निरोगी आयुष्याकडे असली पाहिजे. “एचआयव्ही मुक्त भारत” यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, असे सांगत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्स या दोघांमधला फरक स्पष्ट केला. एचआयव्ही एड्स जनजागृती बद्दल सायकल राईड आयोजित केल्याबद्दल आनंद होत आहे. युवकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या आजाराविषयी जनजागृती होणे आजही तितकेच गरजेचे आहे. कारण आजची पिढी ही व्यसनाधिनतेकडे झुकत आहे. आशादायक एक गोष्ट आहे की, या आजारावर असलेली औषधेही प्रगत होत चालली आहेत. यावेळी एड्स या आजाराविषयीची कारणे आणि त्यावरील उपाय या संदर्भात डॉ.पवार यांनी मार्गदर्शन केले. 2010-11 सालचा आणि आत्ताचा सक्सेस रेट पाहिला तर एचआयव्ही पॉझिटिव्हचे प्रमाण कमी होत आहे आणि हे केवळ जनजागृतीमुळे शक्य आहे. अनेक सेवाभावी संस्था या जनजागृतीमध्ये हातभार लावतात त्यामुळे त्यांचे आभार मानावे तितके कमी आहे.

     आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे अध्यक्ष कमलेश प्रधान यांनी नुकतीच कैलास–मानस सरोवर यात्रा आणि कैलास पर्वत परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, ज्यावेळी तुम्ही शरीराने फिट असाल त्याच वेळेला ही यात्रा पूर्ण करा. जसजसे वय होत जाते तसे तसे तुमच्याकडे पैसा आणि वेळ असतो पण शरीर साथ देत नाही त्यामुळे जितक्या कमी वयात तुम्हाला ही यात्रा पूर्ण करता येईल तितक्या लवकर तुम्ही ही पूर्ण करा. जिद्द, चिकाटी, फिटनेस आणि परमेश्वरावरचा विश्वास असेल तर ही यात्रा तुमची नक्की पूर्ण होईल.

     यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, ठाणे जिल्हा मुख्य दंत शल्यचिकित्सक डॉ.अर्चना पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी रतन गाढवे, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे सचिव दीपेश दळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुरेश महावरकर, जिल्हा पर्यवेक्षक अशोक देशमुख आणि निलिमा पाटील आदी उपस्थित होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Angry Angry 0
Sad Sad 0
Wow Wow 0