साप्ताहिक संपादकांसाठी ठाण्यात एकदिवसीय कार्यशाळा व अधिवेशन संपन्न
साप्ताहिक संपादक असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण
ठाणे : महाराष्ट्र राज्याचे कार्यसम्राट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुःखद निधन झाले त्यांना साप्ताहिक संपादक असोसिएशनच्या वतीने ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयात येथे आयोजित साप्ताहिक संपादक कार्यशाळा व राज्यस्तरीय अधिवेशना कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर, डिजिटल माध्यम समस्यांवर मार्गदर्शन करणारे कन्सल्टंट युवराज आर्य, अॅड. स्मिता चिपळूणकर (जर्नलिस्टस असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष) तसेच पर्यावरण रक्षक विजयकुमार कट्टी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यशाळेत बोलताना ज्येष्ठ पत्रकार सदानंद खोपकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मोबाईल आणि सोशल मीडियामुळे आजची पत्रकारिता भरकटत चालली आहे. मोबाईलवर दिसणारी प्रत्येक गोष्ट बातमी नसते. पत्रकारांनी वाचनाची सवय वाढवली पाहिजे तसेच स्वतःचे लेखन सातत्याने केले पाहिजे. वाचन व लेखनातूनच खरी आणि दर्जेदार पत्रकारिता घडते. तसेच प्रत्येक पत्रकार संपादकांनी एकतरी पुस्तक काढले पाहिजे. तसेच साप्ताहिक वृत्तपत्र चालवताना येणाऱ्या विविध अडचणींवर त्यांनी मार्गदर्शन केले. डिजिटल माध्यमांच्या संदर्भात युवराज आर्य यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत सांगितले की, सध्या विविध डिजिटल अॅप्सच्या माध्यमातून माहिती संकलन व लेखन सुलभ झाले आहे. मुलाखत किंवा एखादी बातमी घटनाक्रमाच्या आधारे डिजिटल साधनांवर मांडल्यास उत्तम लेखन तयार होऊ शकते. मात्र, या माध्यमांवर कधी कधी चुकीची माहितीही दिली जाते, त्यामुळे पत्रकारांनी मिळालेल्या माहितीची सत्यता तपासणे अत्यंत आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आरएनआय व पीआयबी या केंद्र सरकारच्या संस्थांमार्फत लागू करण्यात आलेल्या नव्या नियम व कायद्यांबाबत अॅड. स्मिता चिपळूणकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. वृत्तपत्र अपलोड करणे, आवश्यक कागदपत्रांची नोंद, पासवर्डची सुरक्षितता, आयडी इतरांना न देणे, मासिक व साप्ताहिक वृत्तपत्रांचे अंक वेळेवर पीआयबीकडे सादर करणे, वार्षिक विवरण मध्ये वृत्तपत्राचा खप, वितरित प्रती, छापील अंकांची अचूक आकडेवारी भरणे या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये चूक झाल्यास किंवा आयडीचा गैरवापर झाल्यास वृत्तपत्र बंद होण्याचा धोका असल्याने संपादकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यावरण रक्षक विजयकुमार कट्टी यांनी पर्यावरण विषय हा पत्रकारितेचा महत्त्वाचा भाग असून, या विषयावर योग्य पद्धतीने लेखन कसे करावे, पर्यावरणाशी संबंधित समस्या कशा हाताळाव्यात आणि त्यावर जनजागृती कशी करता येईल याबाबत पत्रकारांना मार्गदर्शन केले. यासंदर्भात आवश्यक माहिती व लेखन साहित्य उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
राजस्तरीय साप्ताहिक संपादक अधिवेशन कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साप्ताहिक संपादक असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी संपादकांच्या विविध अडचणी, शासन दरबारी मांडलेल्या मागण्या आणि संघटनेच्या एकजुटीचे महत्त्व याबाबत माहिती दिली. यावेळी साप्ताहिक संपादकांनी आपल्या अधिकारासाठी संघटीत राहुन आपली लेखणी बुलंद करण्यासाठी आवाहन केले. कार्याध्यक्ष भीमराव धूळप यांनी सांगितले की, सर्व संपादक एकत्रित राहिल्यास निश्चितच परिवर्तन घडवून आणता येईल. अधिवेशन प्रवेश, यादीकरण व अधिस्वीकृतीधारक कार्डसंबंधी प्रश्न सोडवण्यासाठीच या संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेच्या उपाध्यक्षा सारिका शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे व सहभागीं संपादकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0