मीरा-भाईंदरमध्ये ‘संत ज्ञानेश्वर वारकरी भवन’चे लोकार्पण संपन्न
इंदुरीकर महाराजांच्या उपस्थिती लोकार्पण संपन्न
मीरारोड : मीरा-भाईंदर मध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री आणि स्थानिक आमदार मा. ना. श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून शहरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेली भक्तांची मागणी आज पूर्ण झाली आहे. ‘संत ज्ञानेश्वर वारकरी भवन’ या भव्य भक्तीस्थळाचे लोकार्पण आज ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या वारकरी भवनाची इमारत दोन मजली असून या भवनासाठी एकूण २ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आलेला आहे.
या लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन, ज्यामध्ये मीरा-भाईंदरमधील हजारो वारकरी बांधव, मिरा-भाईंदर शहरातील अनेक भजन मंडळ आणि कीर्तनप्रेमींनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थिती नोंदवली. नाट्यगृह भक्तीच्या ओव्या, टाळ-मृदंगाच्या नादाने आणि “विठ्ठल भक्ती”च्या गजराने दुमदुमून गेले. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे वारकरी भवन म्हणजे फक्त एक वास्तू नाही, तर वारकरी संप्रदायासाठी उभे राहिलेले एक आध्यात्मिक तीर्थस्थान आहे अशी भावना वारकरी मंडळींनी व्यक्त केली.
या लोकार्पण सोहळ्यादरम्यान मंत्री सरनाईक म्हणाले की,“ भक्ती, संत परंपरा आणि समाजप्रबोधन यांचा संगम असलेले हे वारकरी भवन म्हणजे “माऊलींच्या कृपेने उभारलेले भक्तीचं हे मंदिर आहे. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा प्राण आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने साकारलेले हे भवन भक्ती, सेवा आणि संस्कार यांचे केंद्र बनून मीरा-भाईंदरचा अभिमान वाढवेल. शहरातील वारकरी बांधवांची दशकांपासूनची मागणी प्रत्यक्षात उतरवली याचा मला अभिमान आहे. मीरा-भाईंदरच्या आध्यात्मिक विकासाचा खरा नवा अध्याय आज पासून सुरु झाला आहे. या भवनात भजन, कीर्तन, प्रवचन, संत साहित्य अभ्यास तसेच वार्षिक धार्मिक कार्यक्रमांसाठी आधुनिक सभागृहाची सोय उपलब्ध आहे. येथून नव्या पिढीतील कीर्तनकार, प्रवचनकार आणि वारकरी तरुणाईला प्रेरणा, मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणार" असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0