समीक्षक मोतीराम कटारे यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न
मुंबई : समीक्षक मोतीराम कटारे यांनी समीक्षेच्या प्रांतात नवउर्जा निर्माण करणारे मौलिक कार्य केले असून, या माध्यमातून त्यांनी मराठी व आंबडेकरी विश्वातील दुलर्क्षित परंतु आश्वासक कवींच्या कवितेवर समीक्षालेखन केले. त्यामुळे मोतीराम कटारे हे नाव मराठी साहित्य क्षेत्रात प्रदीर्घकाळ लक्षात ठेवले जाईल असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व प्रकाशक डाॅ. दादा गोरे यांनी, दादर येथील आंबेडकर भवन येथील सभागृहात आयोजित केलेल्या सर्जनशील कृतज्ञता सोहळ्यात केले.
समीक्षक मोतीराम कटारे यांच्या लेखनकर्तृत्वाविषयीची कृतज्ञता म्हणून भारतीय जनता (मासिक) व हेतकर्स पब्लिकेशनतर्फे सृजनशील कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन दादर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. या सोहळ्यात कटारे यांना मानपत्र, शाल व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार, गोदा प्रकाशनचे प्रकाशक व साहित्यिक डाॅ. दादा गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्याचे अध्यक्ष दलित पॅंथरचे कार्यकर्ते प्रा. एकनाथ जाधव होते. यावेळी विचारमंचावर, साहित्य क्षेत्रातील मान्यवर कवी शिवा इंगोले, कवी लेखक प्रा. गंगाधर अहिरे, कवी अमोल बागुल, कादंबरीकार शिल्पा कांबळे, कवी अविनाश गायकवाड, भारतीय जनताचे संपादक प्रसेनजित व कवी लेखक, प्रकाशक सुनील हेतकर उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या सर्जनशील कृतज्ञता सोहळ्यातील या पहिल्याच सत्रात अध्यक्ष प्रा. एकनाथ जाधव यांनी कटारेंच्या, प्रारंभीच्या जडणघडणीविषयीच्या आठवणी सांगितल्या . सांगून ते म्हणाले, बोधी ही संकल्पना घेऊन कटारेंनी आपली समीक्षा दृढचित्त केली. कवितेतून येणारे तत्त्वज्ञान, परिवर्तनशीलता, समाज परिवर्तन, मंथन आणि स्वान्तसुखाय मांडणी याबाबत कटारेंनी समीक्षेतून बहुमोल मांडणी केली आहे. यावेळी शिवा इंगोले, प्रा. गंगाधर अहिरे, अमोल बागुल, शिल्पा कांबळे, अविनाश गायकवाड यांनीही आपापल्या मनोगतातून कटारें यांच्यातील कवी, समीक्षक, कार्यकर्ता व माणूस उभा केला. कटारेंना दिलेल्या मानपत्राचे लेखन सुनील हेतकर यांनी केले होते तर त्याचे वाचन प्रा. सिद्धार्थ तांबे यांनी केले. भारतीय जनताचे संपादक व आयोजक प्रसेनजित यांनी सर्वांचे स्वागत केले. कवी-लेखक, प्रकाशक सुनील हेतकर यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन कविता मोरवणकर यांनी केले तर आभार आबा मुळीक यांनी मानले.
दुसर्या सत्रात मोतीराम कटारेंची वाङमयीन भूमिका व दिशादिग्दर्शन या विषयावर परिसंवाद रंगला. या परिसंवादात खेळचे संपादक मंगेश नारायण काळे, पालितज्ज्ञ देवेंद्र उबाळे चर्चक म्हणून उपस्थित होते. तर या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी आंबेडकरी समीक्षक अरविंद सुरवाडे होते. या परिसंवादाचे सुत्रसंचालन प्रतिक पवार यांनी केले तर आभार प्रशिक कटारे यांनी मानले. दुसर्या परिसंवादात कटारेंच्या समीक्षा व वैचारिक लेखनावर चर्चा झाली. या परिसंवादाचे अध्यक्ष सदधम्म पत्रिकेचे संपादक व बौद्ध अभ्यासक प्रा. आनंद देवडेकर होते तर चर्चक म्हणून आंबेडकरी समीक्षक डाॅ. अशोक इंगळे व उज्ज्वला आवाड उपस्थित होते. या सर्वांनी आपल्या मनोगतात, कटारेंच्या समीक्षेतून आलेला बुद्धविचार अधोरेखित केला. प्रा. देवडेकर यांनी मोतीराम कटारेंच्या समीक्षेतून आलेला बुद्धविचाराचा अनुनय करीत तो विचार अधिकाधिक साहित्यातून येणे गरजेचे आहे असे मत नोंदविले. या परिसंवादाचे सुत्रसंचालन सुशील म्हसदे यांनी केले तर आभार राजू खराटे यांनी मानले.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0