येत्या दिवाळीत मिरा-भाईंदरमध्ये पॉड टॅक्सीचे भूमिपूजन! - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
२६ विकासकामांचा आढावा आणि ऐतिहासिक पॉड टॅक्सी प्रकल्पास मंजुरी
भाईंदर : भविष्यात मिरा - भाईंदर शहराच्या वाहतूक कोंडीवर शाश्वत उपाय म्हणून पर्यावरण पूरक असा पॉड टॅक्सी (उन्नत कार) प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या दिवाळीमध्ये करण्याचा मानस असून पुढील दोन वर्षात हा प्रकल्प शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध असेल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये बोलावलेल्या विविध विकास कामाच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मीरा-भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १८०० कोटींच्या विविध प्रकल्पांना तसेच रस्ते दुरुस्तीसाठी ९०० कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली होती. त्याअंतर्गत सुरू असलेल्या आणि नियोजित एकूण २६ विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आज मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यापैकी बहुतेक विकास कामे नोव्हेंबर पूर्वी पूर्ण होतील, त्या सुविधांचा लाभ शहरातील नागरिकांना निश्चित होईल.
या बैठकीत महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय :
शहरातील रस्ते विकास, पाणीपुरवठा, समाजभवन, स्मशानभूमी, स्मारक उद्घाटन आदी २६ प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
१८०० कोटींच्या निधीतून ९०० कोटी रुपये केवळ रस्त्यांसाठी खर्च करण्यात येणार आहेत.
बहुतांश प्रकल्प सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान पूर्ण होणार असून मेट्रो प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत कार्यान्वित होईल.
पॉड टॅक्सी प्रकल्प – एक आधुनिक परिवहन व्यवस्था
बैठकीतील सर्वात मोठा आकर्षण ठरला तो म्हणजे मीरा-भाईंदर शहरासाठी घोषित झालेला पॉड टॅक्सी प्रकल्प. गुजरातमधील बडोदा येथे सुरू होणाऱ्या प्रकल्पानंतर महाराष्ट्रातील हा दुसरा पॉड टॅक्सी प्रकल्प ठरणार आहे.
प्रकल्पाचा आराखडा :
एकूण अंदाजित खर्च – ₹१,००० कोटी
PPP (Public-Private Partnership) तत्वावर राबवला जाणार
शासकीय निधीचा एकही रुपया वापर न करता प्रकल्पाची अंमलबजावणी
महापालिकेने कारशेडसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश
प्रकल्पाची वैशिष्ट्ये :
किमान १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांवरच प्रकल्प उभारला जाईल
१६ पॉड टॅक्सी स्टेशन – मेट्रो स्टेशन्सना जोडलेले
प्रती पॉड टॅक्सी वेटिंग वेळ – फक्त २ मिनिटे
तिकीट दर – १ ते २ किमी प्रवासासाठी ₹३० (३० वर्षांपर्यंत स्थिर दर)
संरचना – T-Strcture व Portal Structure पद्धतीने उभारणी
सुरक्षा – अँटी कोलीझन सिस्टम व एन्व्हायर्नमेंट स्कॅनिंग तंत्रज्ञान
प्रकल्पाची कार्यवाही व टाईमलाईन :
भूमिपूजन – डिसेंबर २०२५ अखेरीस
प्रारंभिक टप्प्यात प्रकल्पाची सुरुवात JP Infra परिसर, प्रभाग १२, १३, १८ येथील रुंद रस्त्यांवरून होणार
या प्रकल्पाविषयी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. नागरिकांसाठी जलद, सुरक्षित व पर्यावरणपूरक प्रवास हा आमचा प्रमुख उद्देश आहे. महापालिका किंवा राज्य शासनाचा एकही रुपया खर्च न होता पॉड टॅक्सी सारखा अत्याधुनिक प्रकल्प मीरा-भाईंदरमध्ये साकारत आहे, याचा मला आणि संपूर्ण शहराला अभिमान वाटतो.
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0